अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर..! बंद गोडाऊनमध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा; FDAकडून जप्ती...
अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बंद गोडाऊनमध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा आढळल्याची माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईत इंजेक्शन, सलाईन, हृदयरुग्णांची औषधे आणि लहान मुलांच्या टॉनिकसह तब्बल १७ प्रकारच्या औषधांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्य आरोग्य भंडारातील फ्रिज निकामी आणि चारपैकी तीन एसी बंद असल्याची माहिती समोर आल्याने औषधांच्या सुरक्षित साठवणुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच जिल्हा परिषद CEO आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर जवंजाळ यांनी केली आहे. जप्त औषधांची यादी, मुदत संपण्याच्या तारखा आणि विल्हेवाटीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
📍 उल्हास अडसड
महाव्हाईस न्यूज, अमरावती
#AmravatiNews#ZillaParishad#HealthDepartment#ExpiredMedicines#FDAAction#MedicineSafety#PublicHealth#HealthNews#MaharashtraNews#MahavoiceNews
अमरावतीत खून प्रकरणाची काही तासांत उकल; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी आरोपी ताब्यात...
अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-१ने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गंभीर खून प्रकरणाची काही तासांत उकल केली.
पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर मोहम्मद तौफिक मोहम्मद शफीक याचा खून केल्याची माहिती आरोपीने चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वाहनाच्या शोधात असतानाच पोलिसांनी मोहम्मद राजीक मोहम्मद काफील याला नांदगाव पेठ परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपीच्या माहितीच्या आधारे धामणा शेतशिवारातील नाल्याजवळ प्लास्टिकच्या पोत्यात ठेवलेला मृतदेह पोलिसांनी शोधून काढला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि सायबर पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
📍 उल्हास अडसड
महाव्हाईस न्यूज, अमरावती
#AmravatiNews#AmravatiPolice#CrimeBranch#MurderCase#PoliceAction#NandgaonPeth#MahavoiceNews
दुष्काळी मदतीचा आदेश उद्याच; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन...
अमरावती विभागातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१नुसार मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी अमरावती विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात येणार असून, आवश्यक पंचनामे करून केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
चाराटंचाई, पाणीटंचाई आणि रब्बी हंगामासाठी उपाययोजनांसोबतच शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठीही मदत देण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जलसंधारणाची कामे वाढवून रोजगार उपलब्ध करण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी मदत दिवाळीपूर्वी देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
📍 उल्हास अडसड
महाव्हाईस न्यूज, अमरावती
#DevendraFadnavis#AmravatiNews#DroughtRelief#FarmersRelief#MaharashtraFarmers#FarmerSupport#AgricultureNews#MaharashtraNews#DroughtNews#MahavoiceNews